

अपर पोलीस अधीक्षक कातकडे यांच्या अध्यक्षतेखाली 500 गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक; अमली पदार्थ विरोध, महिला सुरक्षा व ध्वनी प्रदूषणावर प्रबोधनाचे आवाहन
सिंदेवाही, चंद्रपूर (प्रतिनिधी)
✍️ स्वामी गोलपल्लीवार
मुख्य संपादक, सिंदेवाही टाईम्स–
पोलीस स्टेशन सिंदेवाही अंतर्गत आगामी गणेशोत्सव व शारदीय नवरात्र / दुर्गोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज दिनांक 07/09/2026 रोजी शांतता समितीची महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. सकाळी 11.30 वाजता सुरू झालेली ही बैठक दुपारी 2.00 वाजता संपन्न झाली.
आगामी सण-उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी आणि सर्व उत्सव शांततेत, सुरक्षित आणि सामाजिक सलोख्याच्या वातावरणात पार पडावेत, या अनुषंगाने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
बैठकीला प्रमुख उपस्थिती:
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी अपर पोलीस अधीक्षक श्री. कातकडे साहेब होते. त्यांच्यासोबत उपविभागीय पोलीस अधिकारी, ब्रह्मपुरी श्री. झरकर साहेब, नायब तहसीलदार सिंदेवाही श्री. सायरे साहेब, MSEB चे अधिकारी, नगरपंचायतचे अधिकारी, नगराध्यक्ष श्री. भास्कर नन्नावरे, काँग्रेस तालुकाध्यक्ष श्री. रमाकांत लोंदे, शहर काँग्रेस अध्यक्ष श्री. सुनील उत्तलवार, भाजप तालुकाध्यक्ष श्री. नागराज गेडाम, जिल्हा शांतता कमिटीचे सदस्य, पत्रकार बंधू, जेष्ठ नागरिक, पोलीस पाटील, डीजे चालक-मालक उपस्थित होते.
या बैठकीला 450 ते 500 गणेश मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते, अशी माहिती पोलीस निरीक्षक कांचन पांडे यांनी दिली.
पोलीस प्रशासनाचा यावर्षीचा नवा उपक्रम:
पोलीस स्टेशन सिंदेवाही दलातर्फे यावर्षी गणेशोत्सव अधिक अर्थपूर्ण करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.
त्यानुसार –
1.अमली पदार्थ विरोधी जनजागृती
2.ध्वनी प्रदूषण नियंत्रण
3.महिला सुरक्षा
या विषयांवर उत्कृष्ट देखावे, जिवंत देखावे अथवा जनजागृतीवर प्रबोधनात्मक कार्यक्रम सादर करणाऱ्या सार्वजनिक गणेश मंडळांना पोलीस स्टेशन सिंदेवाही तर्फे प्रथम, द्वितीय आणि तृतीय विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली.
डीजे बाबत कडक नियम:
ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी यावर्षी डीजे बाबत ‘दोन टॉप – दोन बेस’ अशी विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल.ही संपूर्ण शांतता समिती बैठक पोलीस निरीक्षक कांचन पांडे (पोलीस स्टेशन सिंदेवाही, जि. चंद्रपूर) यांनी आयोजित केली होती. यावेळी गोपनीय पोलीस श्री. कमलेश फेंडर, नपोअ श्री. नारायण येगेवार यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
अशाच विधायक बातम्यांसाठी सिंदेवाही टाईम्स ला फॉलो करा
जाहिराती | बातम्या | विशेष लेख | प्रसिद्धीपत्रके |
कार्यक्रम प्रसिद्धी यासाठी संपर्क साधा.
✍️ स्वामी गोलपल्लीवार
मुख्य संपादक, सिंदेवाही टाईम्स
📞 9404530122
