चंद्रपूर । सावली प्रतिनिधी
सावली तालुक्यातील मौजा चांदली बुज येथे सामूहिक वनहक्क मंजूर झालेल्या जमिनीबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या स्पष्ट आदेशाला वन विभागाने केराची टोपली दाखवल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे येथील शेतकरी आणि वनहक्कधारकांमध्ये प्रचंड असंतोष आहे.
काय आहे प्रकरण?
सन १९७६ पासून अस्तित्वात असलेल्या वन अतिक्रमणधारकांचे क्षेत्र वगळून उर्वरित जागेवर वृक्षलागवड करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र, वन विभागाने या आदेशाची अंमलबजावणी करण्यास हलगर्जीपणा केला.दुसरीकडे लाभार्थ्यांनी कष्टाने पिकविलेल्या पिकांमध्ये गावातील वन समितीमार्फत अनधिकृतपणे जनावरे चारण्यात आली. यामुळे उभ्या पिकांची मोठ्या प्रमाणावर नासधूस झाली असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
इंटकचा तीव्र आक्षेप
या प्रकरणाची दखल घेत भारतीय राष्ट्रीय मजदूर काँग्रेस – इंटक च्या चंद्रपूर जिल्हा शाखेने DFO, चंद्रपूर यांना निवेदन दिले आहे.
इंटकच्या प्रमुख मागण्या:
1.१९७६ च्या अतिक्रमणाची तात्काळ पाहणी व मोजणी करून ते क्षेत्र वगळावे. उर्वरित जमिनीवर तातडीने वृक्षलागवड करावी.
2.पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचा तातडीने पंचनामा करावा.
3.दोषींवर चौकशी करून कठोर कारवाई करावी आणि बाधित शेतकऱ्यांना आर्थिक भरपाई द्यावी.
4.भविष्यात शेतात जनावरे घुसू नयेत यासाठी ठोस नियमावली लागू करावी.
5.जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला टाळाटाळ करणाऱ्या जबाबदार वन अधिकारी-कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करावी.
आंदोलनाचा इशारा
इंटकने इशारा दिला आहे की, प्रशासनाने वरील मागण्यांवर त्वरित कारवाई केली नाही, तर बाधित शेतकरी व वनहक्कधारकांसोबत वरिष्ठ स्तरावर तीव्र आंदोलन छेडले जाईल.प्रशासनाचा आदेश असतानाही वृक्षलागवड प्रलंबित ठेवणे आणि दुसरीकडे पिकांची नासधूस होऊ देणे, या दुहेरी प्रकारामुळे वन विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
✍️स्वामी गोलपल्लीवार
मुख्य संपादक, सिंदेवाही टाईम्स
TAGS: #ChandliBuj #Sawali #ForestRights #Chandrapur #INTUC #FarmerIssue #SindavahiTimes
Home मुख्य बातम्या चांदली बुज येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली वनहक्काच्या शेतात पिकांचे नुकसान; शेतकरी...
