Home चंद्रपूर जिल्हा नवरगावच्या वेशीवर बिबट्याचा थरार, दुचाकीवरील दोन तरुण थोडक्यात बचावले

नवरगावच्या वेशीवर बिबट्याचा थरार, दुचाकीवरील दोन तरुण थोडक्यात बचावले

7
0

बिबट्या थेट पायापर्यंत पोहोचला, भाजीपाल्याची पिशवी तोंडावर मारल्याने वाचले प्राण

नवरगाव, दि. 12 नोव्हेंबर :

स्वामी गोलपल्लीवार मुख्य संपादक

बुधवार, दिनांक 11 नोव्हेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास सिंदेवाहीकडून नवरगावला मोटारसायकलने येणाऱ्या दोन तरुणांवर बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रसंगावधानामुळे दोघेही बालबाल बचावले.

मूल येथील आठवडी बाजार आटोपून रत्नापूर येथील संजय कुळमेथे आणि संदीप रेपकवार हे घरी परतत होते. नवरगावच्या अगदी जवळ, स्मशानभूमीलगत असलेल्या सदानंद बोरकर यांच्या फार्महाऊसमधून अचानक बिबट्या रस्त्यावर आला आणि त्यांच्या दुचाकीचा पाठलाग करू लागला.

संजय कुळमेथे गाडी चालवत होते, तर संदीप रेपकवार मागे बसले होते. बिबट्या थेट संदीप यांच्या पायापर्यंत पोहोचला. मात्र, संदीप यांनी हातातील भाजीपाल्याची पिशवी बिबट्याच्या तोंडावर मारली. त्यामुळे बिबट्या मागे फिरला आणि दोघांचेही प्राण वाचले.

वनविभागाशी चर्चा केली असता, संबंधित बिबट मादी असून तिच्यासोबत तिचे बछडेही या परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे या भागात नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. पिल्लांसोबत असलेल्या बिबट मादीच्या वावरामुळे परिस्थिती अधिक संवेदनशील बनली आहे.

नवरगावच्या वेशीवरच घडलेली ही घटना अत्यंत गंभीर आहे. नागरिकांनी रात्रीच्या वेळी या मार्गाने प्रवास करताना विशेष खबरदारी घ्यावी आणि बिबट दिसल्यास तातडीने वनविभागाला कळवावे.

आज दोन तरुण बचावले, मात्र प्रत्येक वेळी नशीब साथ देईलच असे नाही. काळजी घ्या.

स्वामी गोलपल्लीवार मुख्य संपादक, सिंदेवाही टाईम्स, सिंदेवाही

 

—

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here