`सावलीचा अभिमान 🌟
————————-
CA कमलेश अढिया (पाथरी)
Ernst & Young Dubai – Partner
————————-
मराठी शाळेतून Big 4 कंपनीपर्यंत!
ग्रामीण मुलांनो, स्वप्नं मोठी ठेवा! 💪
– सिंदेवाही टाइम्स`
सावली/चंद्रपूर: “गावातून शिकून काय होणार?” या प्रश्नाला सावली तालुक्यातील पाथरी गावच्या CA कमलेश अढिया यांनी आपल्या कर्तृत्वाने सडेतोड उत्तर दिले आहे. ग्रामीण भागातून शिक्षण घेऊन त्यांनी थेट दुबईतील जगप्रसिद्ध Ernst & Young या Big 4 कंपनीत “Partner” पदापर्यंत मजल मारली आहे.
मराठी शाळेतून EY च्या पार्टनरपदी
कमलेश अढिया यांचे प्राथमिक शिक्षण मराठी माध्यमातून झाले. त्यांनी नवरगावच्या भारत विद्यालयात माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. पुढे सिंदेवाही आणि चंद्रपूर येथे शिक्षण घेत त्यांनी CA ची पदवी मिळवली. पाथरीसारख्या छोट्याशा गावातून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज दुबईतील कॉर्पोरेट जगतातील सर्वोच्च पदावर पोहोचला आहे.
कुटुंबाचे संस्कार आणि जिद्द
त्यांचे वडील राजेंद्रजी अढिया हे परिसरातील प्रतिष्ठित व्यापारी आहेत. कुटुंबातील शिक्षणावरील निष्ठा, संस्कार आणि स्वतःच्या कठोर परिश्रमाच्या जोरावर कमलेश यांनी हे यश संपादन केले. त्यांची ही पदोन्नती केवळ वैयक्तिक नसून संपूर्ण सावली तालुका आणि चंद्रपूर जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे.
ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा
“परिस्थिती कितीही कठीण असली तरी प्रबळ इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर मोठी झेप घेता येते”, हे कमलेश अढिया यांनी सिद्ध केले आहे. आज ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थ्यांसाठी त्यांचा प्रवास एक प्रेरणास्त्रोत बनला आहे.
—
