मुख्यसंपादक : स्वामी गोलपल्लीवार, सिंदेवाही
सिंदेवाही: गुंजेवाही परिसरात दहशत माजवणाऱ्या आणि चार महिलांचा बळी घेणाऱ्या ‘टी-2’ वाघिणीला वनविभागाने जेरबंद केले आहे. 22 मे रोजी तेंदूपत्ता संकलन करणाऱ्या चार महिलांवर हल्ला करून वाघिणीने त्यांना ठार केले होते. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती.
वनविभागाची मोठी मोहीम:
घटनेची गंभीर दखल घेत वनविभागाने तातडीने मोहीम हाती घेतली. वाघिणीच्या हालचाली टिपण्यासाठी जंगलात 4 मोठे पिंजरे व 20 ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत मोशन सेन्सर आणि लाईव्ह सीसीटीव्ही कॅमेरेदेखील तैनात करण्यात आले होते. अखेर 24 मे रोजी वाघिणीला सुरक्षितपणे जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले.
पुढे काय?
जेरबंद केल्यानंतर वाघिणीला चंद्रपूर येथील TTC केंद्रात हलवण्यात आले. आता तिला अमरावती जिल्ह्यातील परतवाडा वन्यजीव विभागाच्या परिसरात मुक्त करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
दरम्यान, या वाघिणीला कायमस्वरूपी कुठे ठेवायचे याबाबतचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नसल्याचे सिंदेवाही वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
📍 सिंदेवाही, जि. चंद्रपूर
✍️ स्वामी गोलपल्लीवार, मुख्यसंपादक
9404530122

