सिंदेवाही । प्रतिनिधी
सध्याच्या डिजिटल युगात सायबर भामटे नवनवीन क्लृप्त्या शोधून नागरिकांना जाळ्यात ओढत आहेत. व्हॉट्सअॅपवर आलेल्या एका अनोळखी लिंकवर क्लिक करणे येथील एका खासगी बँकेच्या व्यवस्थापकाला चांगलेच महागात पडले आहे.
सावरगाटा येथील घटना
तालुक्यातील सावरगाटा चक येथील अतुल बाबुराव लोनबले हे मल्टी अर्बन निधी लिमिटेड या खासगी बँकेत व्यवस्थापक पदावर कार्यरत आहेत. नेहमीप्रमाणे 26 जानेवारी रोजी कामावर असताना त्यांच्या मोबाईलवर व्हॉट्सअॅपवर एक अनोळखी लिंक प्राप्त झाली. उत्सुकतेपोटी लोनबले यांनी सदर लिंकवर क्लिक केले आणि काही क्षणांतच त्यांच्या मोबाईलचा संपूर्ण ताबा अनोळखी सायबर भामट्यांच्या हात गेला.
3 लाख रुपये लांबवले
फोन हॅक झाल्यानंतर दुपारी 12 वाजेच्या सुमारास त्यांच्या बँक ऑफ इंडिया, शाखा गुजेवाही खात्यातून अनुक्रमे 2 लाख रुपये आणि 1 लाख रुपये असे एकूण 3 लाख रुपये वळते झाल्याचा मेसेज मोबाईलवर धडकला.
खात्यातून एवढी मोठी रक्कम गायब झाल्याचे पाहताच लोनबले यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांनी तात्काळ बँकेत जाऊन खाते होल्डवर ठेवण्यास सांगितले.
गुन्ह्याचे धागेदोरे पश्चिम बंगालपर्यंत
सायबर भामट्यांनी लोनबले यांच्या खात्यातील 3 लाख रुपये थेट पश्चिम बंगालमधील हावडा येथील ‘बँक ऑफ महाराष्ट्र’च्या एका खात्यात वर्ग केले. पोलीसांना चकमा देण्यासाठी या रकमेतील 99,500 रुपये हावडा येथील ‘पंजाब नॅशनल बँक’च्या दुसऱ्या खात्यात पाठवले आणि अवघ्या काही वेळातच ही संपूर्ण रक्कम एटीएमद्वारे रोख स्वरूपात काढून पळ काढला.
सिंदेवाही पोलिसात गुन्हा दाखल
आपली फसवणूक झाल्याची खात्री पटताच अतुल लोनबले यांनी सिंदेवाही पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. तक्रारीवरून सिंदेवाही पोलिसांनी हावडा येथील संबंधित संशयित खातेदारांविरुद्ध ‘भारतीय न्याय संहिता’ BNS 2023 च्या कलम 318(4), 319(2) आणि ‘माहिती तंत्रज्ञान’ IT अधिनियम 2000 च्या कलम 66(ड) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
तत्पूर्वी लोनबले यांनी राष्ट्रीय सायबर गुन्हे नोंदणी पोर्टल NCCRP 1930 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधून ऑनलाइन तक्रारही नोंदवली होती.
सिंदेवाही पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कांचन पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक या आंतरराज्यीय सायबर गुन्ह्याचा पुढील सखोल तपास करत आहे.
नागरिकांना आवाहन
पोलीसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नये. आपली बँक माहिती, OTP कोणासोबतही शेअर करू नये.
– स्वामी गोलपल्लीवार
मुख्य संपादक, सिंदेवाही टाईम्स
TAGS: #CyberFraud #Sindavahi #BankFraud #WhatsAppScam #Chandrapur

