✍️ स्वामी गोलपल्लीवार, मुख्यसंपादक
सिंदेवाही | विशेष लेखन: युनुसभाई शेख
एका बाजूला हजारो रुपये मोजून पर्यटक वाघाचं दर्शन घेण्यासाठी विदर्भाच्या जंगलात येतात. वाघ दिसला की कॅमेरे सरसावतात, जल्लोष होतो. ती क्षण आयुष्यभराची आठवण बनते.
पण त्याच जंगलाच्या काठावर राहणाऱ्या गरीब शेतकरी, वनमजूर, गुराखी, आदिवासी बांधवासाठी जंगल हे पर्यटनाचं ठिकाण नाही, तर जगण्याचं साधन आहे. त्यांच्यासाठी वाघाचं दर्शन म्हणजे मृत्यूचं सावट.
विदारक वास्तव:
चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही, ब्रह्मपुरी, सावली, मूल, नागभीड, बल्लारपूर, चिमूर परिसरात गेल्या दशकात मानव-वाघ संघर्षाने उग्र रूप धारण केलंय. अनेक निष्पाप शेतकरी, महिला, वनमजूर वाघांच्या हल्ल्यात बळी पडले. असंख्य कुटुंब उद्ध्वस्त झाली, मुलं पोरकी झाली.
ज्याला पाहण्यासाठी पर्यटक लाखो रुपये खर्च करतात, त्याच वाघाच्या हल्ल्यात एखादा गरीब मजूर जीव गमावतो. एका बाजूला सफारीचा आनंद, तर दुसऱ्या बाजूला घरची चूल कायमची विझते.
पण दोष कोणाला द्यायचा?
वाघांचे मृत्यूही तितकेच चिंताजनक आहेत. जंगल कमी होणं, अतिक्रमण, रस्ते, रेल्वे, औद्योगिक विस्तारामुळे वाघ आणि मानव यांचं अंतर कमी झालंय. आज जंगलात वाघ सुरक्षित नाही आणि काठावर माणूसही सुरक्षित नाही.
युनुसभाई शेख यांची मागणी:
सामाजिक कार्यकर्ते तथा नगरसेवक युनुसभाई शेख म्हणतात, “दोषारोप करून प्रश्न सुटणार नाही. गरज आहे सहअस्तित्वाची.”
म्हणून त्यांनी राज्य शासन आणि वन विभागाकडे मागणी केली आहे की:
“वनरक्षक समिती” स्थापन करावी. ज्यात वन विभागासोबत ग्रामपंचायत, शेतकरी, तज्ञ, सामाजिक कार्यकर्ते असतील. या समित्या सतर्कता यंत्रणा उभारतील, वाघांच्या हालचालींची माहिती देतील, जनजागृती करतील, संघर्षग्रस्त कुटुंबांना मदत करतील.
शेवटचा संदेश:
वाघ मरतो तेव्हा जंगल हरतं… माणूस मरतो तेव्हा समाज हरतो…
म्हणून एकच आवाज – “मानव जगला पाहिजे, जंगल वाचले पाहिजे आणि वन्यप्राणी सुरक्षित राहिले पाहिजेत.”
संपर्क: युनुसभाई शेख, नगरसेवक, सिंदेवाही-लोनवाही – 9423608239
– स्वामी गोलपल्लीवार
मुख्य संपादक, सिंदेवाही टाइम्स
—

