सिंदेवाही-लोणवाही । प्रतिनिधी
नगर पंचायत सिंदेवाही-लोणवाही अंतर्गत वॉर्ड क्र. 2, महालक्ष्मी नगर येथे पावसाळा सुरू होताच नागरिकांना पाणी साचणे आणि मच्छरांच्या उपद्रवाला सामोरे जावे लागत आहे. नाल्यांची योग्य व्यवस्था नसल्याने संपूर्ण वॉर्डात पाणी साचत असल्याची तक्रार स्थानिक नागरिक प्रशांत गोर्लावार यांनी नगराध्यक्ष आणि नगरसेवकांना केली आहे.
काय आहे समस्या?
1.नाली बांधकाम नाही: महालक्ष्मी नगरमध्ये पक्क्या नालीचे बांधकामच नसल्याने पावसाचे पाणी निचरा होत नाही.
2.नाली बुजली: कच्च्या नालीमध्ये झाडे उगवल्याने ती पाणी वाहून नेण्यास असमर्थ आहे. पावसाळ्यापूर्वी सफाईही करण्यात आलेली नाही.
3.अतिक्रमण: काही रहिवाशांनी घरासमोरील नालीमध्ये माती टाकून किंवा बांधकाम करून ती बुजवली आहे.
4.पाणी रस्त्यावर: अख्ख्या वॉर्ड क्र.2 चे पाणी एकाच ठिकाणाहून वळविल्याने ते नाल्याने न जाता रस्त्यावरून वाहत आहे. काही नाल्या चुकीच्या पद्धतीने बांधल्याने पाणी रस्त्यावरच साचत आहे.
नागरिकांना त्रास
या सर्व प्रकारामुळे काहींच्या घरात पाणी जात आहे तर काहींना घराबाहेर पडणेही अवघड झाले आहे. सर्वत्र पाणी साचल्याने मच्छरांचा प्रचंड त्रास वाढला आहे. डेंग्यू, मलेरिया सारखे आजार पसरण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत.
नगर पंचायतीकडे मागणी
प्रशांत गोर्लावार यांनी निवेदनात म्हटले आहे की, “एवढी समस्या असूनही नगर पंचायत प्रशासनाचे वॉर्डाकडे लक्ष नाही ही दुःखद बाब आहे. तरी नगराध्यक्ष, नगरसेवकांनी प्रत्यक्ष वॉर्डात येऊन पाहणी करावी आणि ही समस्या कायमची सोडवावी.”नगर पंचायत प्रशासनाने तातडीने पाहणी करून अति आवश्यक सुधारणा कराव्यात अशी मागणी सर्व वॉर्डवासीयांनी केली आहे.
✍️स्वामी गोलपल्लीवार
मुख्य संपादक, सिंदेवाही टाईम्स
TAGS: #Sindavahi #Lonwahi #NagarPanchayat #Ward2 #Drainage #Mosquito #SindavahiTimes


