सावली । प्रतिनिधी
सावली तालुक्यातील सावली वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या सामदा परिसरात दागोबा जवळ वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे.
महिन्याभरात दुसरा बळी
मृत शेतकऱ्याचे नाव हिरामण साखरे वय 62, रा. सामदा असे आहे. ते आपल्या शेतात कामासोबत गुरे चारीत असताना हा हल्ला झाला.
विशेष म्हणजे, याच जागेजवळच्या परिसरात गेल्या महिन्याभरापूर्वीच एका रानटी हत्तीच्या हल्ल्यात एक व्यक्ती ठार झाली होती. हत्तीच्या दहशतीनंतर आता वाघाची दहशत सुरू झाल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
प्रशासनाला माहिती, पंचनामा झाला
या घटनेची माहिती सावली वन विभाग आणि सावली पोलिसांना देण्यात आली. घटनास्थळी पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.
शेतकऱ्यांची मागणी
हत्ती आणि आता वाघाच्या हल्ल्यांमुळे सामदा, सोनापूर येथील शेतकरी प्रचंड घाबरले आहेत. शेतात कामाला जाणे धोक्याचे झाले आहे.
त्यामुळे वन विभागाने तातडीने वाघाचा बंदोबस्त करावा आणि परिसरात गस्त वाढवावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
✍️ स्वामी गोलपल्लीवार
मुख्य संपादक, सिंदेवाही टाईम्स
TAGS: #Sawali #TigerAttack #Samda #ForestDepartment #FarmerDeath #SindavahiTimes

