लोकमान्य प्राथमिक विद्यालयात ऑटोचालकांसोबत रक्षाबंधन उत्साहात
वरोरा, दि. २ सप्टेंबर: सिंदेवाही टाईम्स, वरोरा प्रतिनिधी
विद्यार्थ्यांनी आयुष्यात चांगल्या गोष्टींची साथ धरावी. कोणी चुकीच्या अथवा वाईट कृत्याकडे प्रवृत्त करत असेल, तर त्याला स्पष्टपणे ‘नाही’ म्हणण्याचे धैर्य ठेवावे. त्याचबरोबर प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतःच्या सुरक्षिततेबाबत जागरूक राहून स्वतःचे संरक्षण करण्याची सवय लावावी, असे प्रतिपादन वरोरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांनी केले.
स्थानिक लोकमान्य प्राथमिक विद्यालयात मंगळवार, १ सप्टेंबर रोजी विद्यार्थ्यांनी त्यांना शाळेत ने-आण करणाऱ्या ऑटोचालकांसोबत रक्षाबंधनाचा उत्सव उत्साहात साजरा केला. या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के उपस्थित होते.
विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सोनटक्के यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. चांगल्या सवयी, योग्य संगत आणि स्वतःच्या सुरक्षिततेबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांना समजेल अशा सोप्या भाषेत गुड टच-बॅड टच अर्थात चांगला व वाईट स्पर्श याबाबतही आवश्यक माहिती देत स्वतःच्या संरक्षणासाठी सतर्क राहण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकशिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. श्रीकांत पाटील होते. प्रमुख उपस्थितीत शाळेचे मुख्याध्यापक उमेश लाभे, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष आशिष घुमे, पालक-शिक्षक संघाचे उपाध्यक्ष नंदकिशोर खिरटकर, वरोरा पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार नितीन भगत तसेच ऑटोचालकांचे प्रतिनिधी विनोद खापणे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. प्रास्ताविकातून मुख्याध्यापक उमेश लाभे यांनी रक्षाबंधन कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर विद्यार्थिनींनी त्यांना दररोज शाळेत सुरक्षितपणे ने-आण करणाऱ्या ऑटोचालकांसह उपस्थित मान्यवरांना राखी बांधून स्नेहबंध दृढ केला.
अध्यक्षीय भाषणात प्रा. श्रीकांत पाटील यांनी शाळेच्या या उपक्रमाचे कौतुक केले. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी, संस्कार आणि सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण करणारे असे उपक्रम सातत्याने राबविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहायक शिक्षिका रजनी गोंडे यांनी केले, तर ज्येष्ठ शिक्षक रामभाऊ घोरुडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या शेवटी ऑटोचालकांच्या वतीने विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.-
अशाच स्थानिक व कामगार विषयक बातम्यांसाठी
सिंदेवाही टाईम्स ला फॉलो करा
जाहिराती | बातम्या | विशेष लेख | प्रसिद्धीपत्रके |
कार्यक्रम प्रसिद्धी यासाठी संपर्क साधा
✍️ स्वामी गोलपल्लीवार
मुख्य संपादक, सिंदेवाही टाईम्स
📞 9404530122

