अमरावती/मुंबई, दि. १९ : – स्वामी गोलपल्लीवार, मुख्य संपादक, सिंदेवाही टाईम्स
राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी समोर येत आहे. राज्यात गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून येत्या शुक्रवारी दुष्काळासंदर्भात शासन निर्णय (GR) काढला जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः याबाबत माहिती दिली आहे.
सध्या मुख्यमंत्री फडणवीस हे अमरावतीच्या दौऱ्यावर असून, अमरावती विमानतळावर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही घोषणा केली.
सोयाबीन, कापूस, तूर, उडदाची परिस्थिती बिकट
यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, “पिकांची परिस्थिती अतिशय खराब आहे. विशेषतः सोयाबीन असेल, काही भागातील कापूस असेल, उडीद असेल, तूर असेल सगळ्या पिकांवर संकट पहायला मिळत आहे. म्हणूनच हा दौरा करून शेतकऱ्यांना कशा प्रकारे मदत करता येईल, हा आमचा प्रयत्न आहे.”
ट्रिगर-1 नुसार दुष्काळ जाहीर होणार
“आपली दुष्काळाची जी संहिता आहे, त्या संहितेनुसार ट्रिगर-१ प्रमाणे दुष्काळ जाहीर करण्याचा जो काही शासन आदेश आहे, तो आदेश आम्ही शुक्रवारी काढणार आहोत. कदाचित त्यामध्ये एखादा दुष्काळी भाग सुटला तर ट्रिगर-३ प्रमाणे आम्ही त्या भागाचा समावेश करू. पण सकृतदर्शनी राज्यात मोठ्या प्रमाणात दुष्काळ दिसून येत आहे,” असे फडणवीस म्हणाले.
शेतकऱ्यांसाठी सरकार काय करणार?
1. चारा टंचाई आणि पाणी टंचाईवर तातडीने कार्यवाही
2. कुठेही अन्नधान्याची कमतरता भासू देणार नाही
3. शेतकऱ्यांना हेक्टरी थेट आर्थिक मदत
4. शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणात खंड पडू न देण्यासाठी उपाययोजना
5. जिथे पाणी उपलब्ध आहे तिथे रब्बी पेऱ्यासाठी मदत
6. जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी कामे काढणार
सध्या राज्यात गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.
– स्वामी गोलपल्लीवार, मुख्य संपादक, सिंदेवाही टाईम्स
#SindewahiTimes #Dushkal #DevendraFadnavis #Drought #Maharashtra #Shetkari #Amravati #Soyabean #GR
—

