Home चंद्रपूर जिल्हा गुंजेवाही हत्याकांड: 4 महिलांचा बळी घेणारी नरभक्षक टी-2 वाघीण अखेर जेरबंद, वनविभागाची...

गुंजेवाही हत्याकांड: 4 महिलांचा बळी घेणारी नरभक्षक टी-2 वाघीण अखेर जेरबंद, वनविभागाची मोठी कारवाई

26
0

gunjewahi-narbhakshak-vaghin-t2-jerband

सिंदेवाही (जि. चंद्रपूर): सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील गुंजेवाही जंगलात तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या चार महिलांचा बळी घेणारी हल्लेखोर टी-2 वाघीण अखेर वनविभागाच्या जाळ्यात सापडली आहे. शनिवारी रात्री 8 वाजताच्या सुमारास या वाघिणीला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी काहीसा सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

अशी झाली कारवाई
वनविभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पवनपार बीट कक्ष क्रमांक 282 मध्ये ही कारवाई करण्यात आली. वाघिणीला बेशुद्ध करून पकडण्याचे आदेश मिळताच विशेष पथकाने युद्धपातळीवर शोधमोहीम राबवली. शनिवारी रात्री सुमारे 7.15 वाजता ट्रॅन्क्युलायझर डार्टद्वारे वाघावर वेध घेण्यात आला. सुरुवातीला अंधारामुळे संभ्रम निर्माण झाला होता, मात्र पडताळणीअंती ती हल्लेखोर टी-2 वाघीणच असल्याचे स्पष्ट झाले.

बछडे सोबत नव्हते, वनविभागाचा तपास सुरू
विशेष म्हणजे, कारवाईच्या वेळी वाघिणीसोबत तिचे बछडे नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे बछड्यांच्या सद्यस्थितीबाबत वनविभाग स्वतंत्र तपास करणार आहे. हीच वाघीण सुनीता मोहूरले, संगीता चौधरी, अनीता मोहूरले आणि कविता मोहूरले या चार महिलांच्या मृत्यूस कारणीभूत असल्याचे वनविभागाने निष्पन्न केले आहे.

पुढे काय?
वाघिणीला जेरबंद केल्याने तात्पुरता दिलासा मिळाला असला तरी ग्रामस्थांमध्ये अजूनही भीती आहे. या वाघिणीला आता कुठे हलवणार? बछडे कुठे आहेत? याबाबत वनविभाग लवकरच माहिती देणार आहे. ‘सिंदेवाही टाइम्स’ या प्रकरणाचा पाठपुरावा करत राहील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here