सिंदेवाही टाइम्स | चंद्रपूर जिल्हा वृत्त
दिनांक: 19 जून 2026, गुरुवार, राजोली
प्रतिनिधी, राजोली – बालू येनूरकर
चंद्रपूर जिल्ह्यातील राजोली गावातील मच्छी चौक परिसरात शासकीय नालीची ग्रामपंचायतकडून दरवर्षी होणारी उपसा कामे यंदा अद्यापही झालेली नाहीत. त्यामुळे अल्प पावसातच नाली तुंबून पाणी लोकांच्या घरात घुसू लागले आहे. पावसाळ्यात परिस्थिती भयावह होण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत.
BDO यांना विचारले असता दिले ‘हे’ उत्तर
या संदर्भात संबंधित BDO यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी “कोर्टाचा आदेश नाही, त्यामुळे उपसा करता येत नाही” असे उत्तर दिले. मात्र पावसाळा तोंडावर आला असतानाही शासकीय नालीची स्वच्छता न झाल्याने नागरिक संतप्त झाले आहेत.
महिलाच उतरल्या मैदानात
प्रशासनाच्या दिरंगाईला कंटाळून राजोलीतील मच्छी चौकातील महिलांनी स्वतःच नाली सफाईचे काम हाती घेतले आहे. गटारीतील साचलेला चिखल, कचरा महिला काढत आहेत. “आमच्या घरात पाणी शिरू नये म्हणून आम्हीच काम करतोय, प्रशासन झोपलंय का?” असा संतप्त सवाल महिलांनी केला.
धोका कोण घेणार?
सध्या पाऊस कमी आहे तरीही पाणी घरात शिरत आहे. पावसाळ्यात मुसळधार पाऊस पडला तर संपूर्ण मच्छी चौक पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. साचलेल्या पाण्यामुळे डास, साथीचे रोग पसरण्याचा धोका वाढला आहे.
“आता जर नाली साफ झाली नाही तर घरात पाणी घुसल्यावर जबाबदार कोण राहणार?” असा प्रश्न ग्रामस्थ विचारत आहेत.
– स्वामी गोलपल्लीवार
मुख्य संपादक, सिंदेवाही टाइम्स
