Home चंद्रपूर जिल्हा 50 किलोची मर्यादा कागदावरच: चंद्रपुरात हमालांच्या पाठीवर 80 किलोचे ओझे, ‘इंटक’चा 30...

50 किलोची मर्यादा कागदावरच: चंद्रपुरात हमालांच्या पाठीवर 80 किलोचे ओझे, ‘इंटक’चा 30 दिवसांचा अल्टिमेटम

15
0

मूल: चंद्रपूर जिल्ह्यातील माथाडी व हमाल कामगारांच्या जिवावर उठलेल्या ‘जादा वजनाच्या गोण्या’ विरोधात आता ‘इंटक’ संघटना आक्रमक झाली आहे. शासनाने 50 किलो वजनाची मर्यादा घालूनही व्यापारी व बाजार समित्यांकडून 60 ते 80 किलोच्या गोण्या उचलून घेतल्या जात असल्याचा गंभीर आरोप ‘इंटक’चे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष दत्तात्रय समर्थ यांनी केला आहे.

याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी, तहसीलदार मूल व जिल्हा उपनिबंधक यांना लेखी निवेदन देऊन तातडीने कारवाईची मागणी केली आहे.

काय आहे कायदा? राष्ट्रीय व राज्य शासनाच्या कामगार कल्याण नियमानुसार आणि आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या (ILO) मार्गदर्शक तत्वांनुसार हमाल कामगारांनी पाठीवर वाहून न्यायची गोणी 50 किलो पेक्षा जास्त असू नये, असा स्पष्ट शासकीय आदेश व जी.आर. आहे.

वस्तुस्थिती भयंकर: मात्र प्रत्यक्षात चंद्रपूर जिल्ह्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समित्या, खाजगी गोदाम व व्यापारी पेढ्यांमध्ये आजही 60 ते 80 किलो किंबहुना त्याहून अधिक वजनाच्या गोण्या उचलून घेतल्या जातात. यामुळे कामगारांना पाठीचे विकार, मणक्याचे आजार व हृदयविकारासारख्या गंभीर समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

‘इंटक’च्या प्रमुख मागण्या:
1. 50 किलो पेक्षा जास्त वजनाची भरती तात्काळ बंद करावी.
2. नियम मोडणाऱ्या व्यापारी व आस्थापनेवर दंडात्मक कारवाई करावी.
3. शेतकऱ्यांनीही 50 किलोच्याच गोणीत शेतमाल विक्री करणे बंधनकारक करावे.

“गरीब कष्टकरी कामगारांच्या आरोग्याचे रक्षण करावे. 30 दिवसात ठोस अंमलबजावणी न झाल्यास संपूर्ण जिल्ह्यात कामबंद आंदोलन छेडण्यात येईल, याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील,” असा इशारा दत्तात्रय समर्थ यांनी निवेदनातून दिला आहे.

✍️स्वामी गोलपल्लीवार
मुख्य संपादक, सिंदेवाही टाइम्स

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here